हे वर्ष शून्य शैक्षणिक वर्ष म्हणून जाहीर करावे; पालक संघटनांची मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'करोनामुळे सन २०२० या वर्षांत सर्वांची जगण्यासाठीची लढाई सुरू आहे. यातच शिक्षणासाठी सुरू असलेला सरकारचा अट्टहास चुकीचा असून, प्रत्यक्ष शाळा सुरू करणे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकते. यामुळे हे वर्ष म्हणून जाहीर करावे,' अशी मागणी पालक संघटनांकडून होत आहे. राज्यातील; तसेच देशातील पालक संघटना यासाठी एकत्र आल्या असून, त्यांनी ट्विटरवर मोहीम सुरू केली आहे. करोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन सुरू आहे. यातून विद्यार्थ्यांना योग्य ते ज्ञानार्जन होत नाही. यामुळे विद्यार्थी केवळ तांत्रिकदृष्ट्या शिकून पुढच्या वर्गात जातीलही. मात्र, प्रत्यक्षात त्यांना ज्ञान मिळणार नाही. यामुळे पुढच्या इयत्तेमध्ये शिकताना त्यांना अधिक त्रास सहन करावा लागेल, असे मतही पालक संघटना मांडत आहेत. यामुळेच राज्य सरकारने आता शाळा सुरू करण्याची घाई करू नये. याचबरोबर सध्याचे शैक्षणिक वर्ष हे शून्य शैक्षणिक वर्ष जाहीर करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षी पुन्हा त्याच वर्गात शिक्षण द्यावे, अथवा या सुरू शैक्षणिक वर्षाचे अधिकचे सहा महिने द्यावेत, अशी मागणी 'पुणे पेरेंट्स' या ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे. तर, विद्यार्थ्याचे सध्या शिक्षण योग्य प्रकारे सुरू नाही. तसेच, ऑनलाइन शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे शून्य शैक्षणिक वर्ष जाहीर करून, सर्वच विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असे मत पालक शिक्षक संघटनेचे प्रसाद तुळसकर यांनी व्यक्त केले आहे. या वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना इतर कौशल्ये शिकवावीत; तसेच त्यांना विविध विषयाचे अतिरिक्त ज्ञान कसे मिळवता येईल, याबाबत मार्गदर्शन करावे, असे मतही त्यांनी मांडले. 'दहावी, बारावीची परीक्षा पद्धत बदलावी' ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाय करावेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी दहावी, बारावी परीक्षांचा पॅटर्नही बदलून त्याचा निर्णयही लवकर व्हावा, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, शाळा कॉलेजे सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणीही या पत्रात केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UXJlA0
via IFTTT

Post a Comment

0 Comments