मटा मालिका: परदेशी शिक्षणाची मात्रा - भाग २: भारतीय विद्यार्थ्यांसाठी पायघड्या

प्रवीण मुळ्ये / नीरज पंडित मुंबई : शिक्षणासाठी परदेशात स्थलांतर करण्यामध्ये चीन आणि भारत हे दोन देश आघाडीवर होते. करोनामुळे सध्या भारत या यादीत अव्वलस्थानी आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर अमेरिका, ब्रिटनमधील अनेक विद्यापीठांचे अर्थकारण अवलंबून असते. यामुळे क्षमताधारी भारतीय विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठात प्रवेश घ्यावे, यासाठी अनेक विद्यापीठांनी नियम शिथिल केले आहेत. याचबरोबर शिष्यवृत्ती योजनेतही वाढ केली आहे. करोनापूर्व काळात दरवर्षी उच्च शिक्षणासाठी जगभरातून सुमारे १० लाख विद्यार्थी आपला मायदेश सोडून परदेशात जात होते. यातील साडेचार लाख विद्यार्थी हे चीन व भारत या दोन देशांमधील असायचे. यात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे सव्वादोन लाख होती. गतवर्षी करोनामुळे परदेशात विद्यार्थी जाऊ शकले नाही. अनेकांचे प्रवेश झाले नाहीत. मात्र यंदा हे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे पात्र भारतीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून विद्यापीठांतर्फे विविध नियम शिथिल केले जात आहेत. याचबरोबर शुल्क सवलतही दिली जात असल्याचे निरीक्षण मार्गदर्शक सुनीत सुरवसे यांनी नोंदविले आहे. सुरुवातीला भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मिळत नव्हता. मात्र गेल्या १५ दिवसांत कॅनडासारख्या देशांनीही विद्यार्थी व्हिसाला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. यामुळे व्हिसा मिळण्याचे प्रमाण वाढत असल्याचेही ते म्हणाले. भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर अनेक देशांची अब्जावधी डॉलरची उलाढाल अवलंबून आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना प्राधान्य देणे त्यांच्याही हिताचे असणार आहे, असेही ते म्हणाले. अटी-शर्थींमध्ये बदल भारतीय विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक शक्कल लढवत आहेत. जीआरई, जी-मॅटसारखा प्रवेश परीक्षांमध्ये सवलत देण्यासारखे निर्णयही अनेक विद्यापीठांनी घेतले आहेत. वैद्यकीय शिक्षण देणारी अनेक विद्यापीठेही प्रवेश परीक्षा रद्द करत आहेत. नियम शिथिल झाल्यामुळे आपोआपच विद्यार्थ्यांचा ओढाही या विद्यापीठांकडे वाढल्याचे चित्र सध्या दिसत असल्याचे करिअर मार्गदर्शक करीत असलेल्या सुचित्रा सुर्वे यांनी सांगितले. याचबरोबर यंदा व्हिसा प्रक्रियाही आता सुरळीत होत आहे. त्यामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच जास्त असेल. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता उत्तम आहे, त्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींमध्येही वाढ झाली आहे. काही विद्यापीठे तर शंभर टक्के शिष्यवृत्ती देत आहेत. ही विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी असल्याचेही सुर्वे यांनी सांगितले. इंजिनीअरिंग, आयटी आणि विज्ञान शाखेच्या विविध कोर्ससोबतच 'लॉ अॅण्ड फायनान्स', 'आर्ट अॅण्ड डिझाइन', 'बिझनेस अॅण्ड मॅनजमेण्ट'मधील अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा अधिक दिसत असल्याचेही त्या म्हणाल्या. लशी देऊन पाठवणारा देश व्हावा करोनाकाळात जगभरात प्रवास करताना लस सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून त्यांना प्रवासापूर्वी लशीच्या दोन्ही मात्रा मिळतील, अशी योजना करावी अशी सूचना पालक शुभदा चौकर यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. तसे झाल्यास परदेशी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पूर्ण लसीकरण करून पाठवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3p7ugKI
via IFTTT

Post a Comment

0 Comments