विशेष मालिका भाग १- परदेशी शिक्षणाची मात्रा: परदेशी शिक्षणात लसीकरणाचा अडसर

प्रवीण मुळ्ये / नीरज पंडित मुंबई : करोनाकाळात घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. मात्र, यंदा हे चित्र बदलले असून, परदेशी विद्यापीठेही भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवास सुलभ व्हावा म्हणून सहकार्य करत आहेत. मात्र, यात अडसर आहे तो लसीकरणाचा. सरकारने याबाबत तातडीने धोरण जाहीर करून परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालक करीत आहेत. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाटेत लसीकरणाचा अडथळा येत आहे. लस दिली जात नाही, तोपर्यंत परदेशी प्रवास करणे सुरक्षित नसल्याने या विद्यार्थ्यांना तातडीने लस द्यावी, अशी मागणी सर्वप्रथम 'मुंबई ग्राहक पंचायत'ने केली होती. यानंतर मुंबई महापालिकेने सोमवारी ३१ मेपासून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. असे असले, तरी या प्रक्रियेला उशीर झाला आहे, असे पालकांचे मत आहे. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुरुवातीला व्हिसा नाकारणारे देश मागील १५ दिवसांपासून सकारात्मक झाले असून, विद्यार्थ्यांना व्हिसासाठी प्राधान्य देत असल्याचे निरीक्षण परदेशी शिक्षण मार्गदर्शक सुनीत सुरवसे यांनी नोंदवले. अमेरिका आणि ब्रिटनमधील बहुतांश विद्यापीठांनी लस घेतलेल्या किंवा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना १० दिवस विलगीकरण सक्तीचे केले आहे. तसेच तेथे लशीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान लागण होऊ नये म्हणून, लस घेऊन जाणे श्रेयस्कर असल्याचेही सुरवसे म्हणाले. तर झाल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, अशी अधिकृत भूमिका कोणत्याही विद्यापीठांनी घेतलेली नाही. मात्र, या विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन समुपदेशन कार्यक्रमात विद्यार्थी लस घेऊन आल्यास उत्तम, असा सल्ला दिला होता, असे पालक शुभदा चौकर यांनी सांगितले. पर्याय काय? मुंबईत सोमवारी ३१ मेपासून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. मात्र, या दिवसापासून कोव्हिशिल्डची दुसरी लस ८४ दिवसांनी घ्यावी लागणार आहे. या नियमानुसार हे विद्यार्थी दुसऱ्या डोसससाठी ऑगस्टअखेरीस पात्र ठरतील. यांतील बहुतांश विद्यार्थी ऑगस्टच्या सुरुवातीलाच परदेशी जाणारे आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी ८४ दिवसांची अट शिथिल करून त्यांच्या प्रवासाच्या तारखेपूर्वी त्यांना दुसरा डोसही मिळेल, अशी व्यवस्था करायला हवी. राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालावे, अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे. जुलै, ऑगस्ट महत्त्वाचे यंदा बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै, ऑगस्ट हे दोन महिने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. या दोन महिन्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी उड्डाण करतील. गतवर्षी विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाऊ न शकल्याने यंदा परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी नोंदविले आहे. मुलुंडमध्ये लसीकरणास सुरुवात परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेनेही पुढाकार घेतला आहे. तर मुलुंडचे आमदार मिहीर कोटचा यांनी शनिवारी परदेशी जाणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने लस दिली. गेल्या काही दिवसांपासून शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडून लस मिळण्याबाबत सतत विचारणा होत होती. त्यामुळे मुंबई महापालिकेची रितसर परवानगी घेऊन या विद्यार्थ्यांची परदेशी विद्यापीठातील प्रवेशाची कागदपत्रे तपासून आम्ही ३०० विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती कोटेचा यांनी 'मटा'ला दिली. विद्यार्थी म्हणतात... राजस पाथरेने युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, अर्वाइन येथे इंजिनीअरिंगच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. विद्यापीठाने आम्हाला दोन पर्याय दिले आहेत. एकतर तुम्ही लस घेऊन या किंवा तेथे हॉटेलमध्ये विलगीकरणात राहून मग लस घ्या. शिवाय लशीचे दोन्ही डोस होइपर्यंत ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण घ्यावे लागेल, अशी अट घातली आहे. हे आर्थिकदृष्ट्याही परवडणारे नाही. त्यामुळे मग इथेच लसीकरण पूर्ण करून मग मी अमेरिकेला जाईन, असे राजसने सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SM4MGE
via IFTTT

Post a Comment

0 Comments